
माझी राशी कोणती?
खूप लोकांना हा प्रश्न पडतो कि माझी राशी कोणती असेल? ह्यासाठी एकतर तुम्हाला तुमची जन्म तारीख (इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे), योग्य जन्म वेळ आणि जन्म ठिकाण माहित असणं गरजेचे आहे. ह्या तीन गोष्टींवरून तुम्हाला ज्योतिष कडून जन्म कुंडली बनवून घेता येते. किंवा तुमची जन्म कुंडली आधीच तयार असेल तर काम सोप्पं झालं.
राशी 12 असतात. 1) मेष 2) वृषभ 3) मिथुन 4) कर्क 5) सिंह 6) कन्या 7) तूळ 8) वृश्चिक 9) धनु 10) मकर 11) कुंभ 12) मीन
राशी ३ प्रकारच्या प्रचलित आहेत. लग्न राशी – चंद्र राशी – सूर्य राशी
जेंव्हा तुम्ही तुमची पत्रिका पहाल तेंव्हा त्यात ‘अथ जन्म कुंडली’ / ‘जन्म लग्न कुंडली’ – ‘लग्न कुंडली’ / ‘Ascendant chart’ / D-1 ह्या पैकी एक नाव असलेली कुंडली दिसेल. ह्यातूनच तुम्हाला वरील तीनही राशी काळातील.
कुंडलीत 12 घर असतात त्याला भाव म्हणतात. कुंडलीच्या मध्य भागी शंकरपाळीच्या आकाराचं जे पहिलं घर (भाव) असतं त्या घराला लग्न भाव म्हणतात. त्याचा लग्न संस्थेशी काहीएक संबंध नाही. त्या भावात (घरात) “ल” किंवा “Asc” असा लिहिलेला असतं. तुमच्या कुंडलीत त्या पहिल्या घरात ज्या राशीचा क्रमांक लिहिला असेल त्या क्रमांकाची राशी झाली लग्न राशी. उदाहरणार्थ: माझ्या कुंडलीत 8 क्रमांक पहिल्या घरात म्हणजेच लग्न भावत असेल तर माझी लग्न राशी झाली वृश्चिक.
त्या मध्ये “चंद्र” किंवा “चं” किंवा “Mo” ज्या क्रमांकाच्या राशी मध्ये लिहिला असेल, त्या क्रमांकाची राशी ही तुमची चंद्र राशी होय. उदाहरणार्थ: जर माझ्या कुंडलीत “चंद्र” 5 क्रमांकाच्या राशीत असेल तर माझी चंद्र राशी असेल सिंह.
तिसरी सूर्य (रवी) राशी. ज्या प्रमाणे आपण चंद्र राशी पहिली तशीच सूर्य राशी पाहायची असते. कुंडलीत ज्या क्रमांकाच्या राशी मध्ये
“र” किंवा “सू” लिहिले असेल त्या क्रमांकाची राशी झाली तुमची सूर्य राशी. उदाहरणार्थ: माझ्या कुंडलीत जर 3 क्रमांकाच्या राशीत “रवी” लिहिला असेल तर माझी सूर्य (रवी) राशी मिथुन असेल.
सामान्य माणसांनी ह्या राशींचा वापर कसा करायचा?
लग्नामधली राशी हि रोज साधारण 2 तासांनी बदलते त्यामुळे जन्म वेळ नीट माहित नसेल तर ह्यात फरक पडू शकतो.
चंद्र एका राशीत साधारण 2.5 दिवस असतो, त्यामुळे सहसा चंद्राची राशी बदलण्याची वेळ तुमच्या जन्म वेळे जवळची नसेल तर तुमची चंद्र राशी बदलत नाही. वर्तमान पात्रात, मासिकात, टी.व्ही. वरती जे राशी भविष्य सांगितले जाते तेंव्हा तुम्ही तुमची चंद्र राशी पाहायची असते. माणसाचा स्वभाव हा लग्न आणि चंद्र राशी वरून ठरतो. पण हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ज्योतिषाची मदत लागेल.
सूर्य मात्र एका राशीत 30 दिवस असतो. सूर्या वरून तुमचा जन्म कोणत्या महिन्यातला आहे हे सहज ओळखू शकतो. सूर्य इंग्लिश कॅलेंडरच्या दर महिन्याच्या मध्यावर म्हणजे साधारण 13 ते 17 मध्ये राशी बदलतो. जानेवारी 14-15 ला तो मकर राशीत जातो मग 14-15 फेब्रुवारीच्या दरम्यान कुंभ राशीत जातो. ह्याच प्रमाणे दर महिन्याच्या मध्यावर पुढच्या राशीत जातो.
इंग्लिश ऍस्ट्रोलॉजि मधली राशी आणि कुंडलीतील चंद्र किंवा सूर्या राशी एकच / सेम असते का?
नाही. इंग्लिश (वेस्टर्न) ऍस्ट्रोलॉजि मध्ये तारखांनुसार राशी बनतात. त्याचा सूर्याच्या राशी चक्रातील भ्रमणाशी संबंध जोडता येईल पण तो तांतो तंत जुळत नाहीं. चंद्र राशीशी तर अजिबात संबंध नाहीं कारण चंद्र दर २.५ दिवसांनी राशी बदलतो. काहींची इंग्लिश ऍस्ट्रोलॉजि मधली राशी आणि कुंडलीतील चंद्र राशी जुळत असेल तर तो निव्वळ योगायोग जाणावा.
तर बघा बरं तुमच्या चंद्र – लग्न – सूर्या राशी कुठल्या आहेत.
Copyright © 2025 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions