Search for:
oti bharan

ओटी भरणा

श्रावण महिना आला की सुवासिनीचे विशेष कार्यक्रम सुरु होतात. त्यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे एका सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनींनी ओटी भरणे. हिंदू धर्मात त्यातही विशेषतः महाराष्ट्रात ह्याला खूप महत्व दिले जाते. लग्न समारंभ, आठंगुळ, डोहाळे-जेवण, बारसं असो किंवा सासरी जाणारी लेक असो व सणा-सुदीला बोलावलेली सवाष्ण असो, ह्यातील प्रत्येक वेळी त्या लग्न झालेल्या बाईची म्हणजेच सुवासिनीची ओटी भरली जाते.


ओटी भरण्या मागचे मुख्य उद्देश म्हणजे एका सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला संतती सुखासाठी दिलेल्या शुभेच्छा. ओटी म्हणजे बेंबीच्या खालचा पोटाचा भाग, जेथे गर्भाशय असते/गर्भ वाढतो. ओटी देताना सुवासिनी आपल्या पदरामध्ये ओटीचे सामान धरून तेच ती दुसऱ्या सुवासिनीच्या पदरात/ओच्यात/दुपट्ट्यामध्ये सोडते आणि वरून ३ किंवा ५ वेळा ओंजळीने तिच्या पदरात तांदूळ घालते. ओटी भरणारी स्त्री दुसऱ्या स्त्रीला नवनिर्मितीचे/वंशवृद्धेचे सामर्थ्य प्रदान करते व आशीर्वाद देते, तिची कूस उजावी, फुलावी, मातृत्वाचा लाभ व्हावा यासाठीचे अभिष्ठचिंतन म्हणजे ओटी भरण. कुमारिकेची किंवा विधवा स्त्रीची ओटी भरली जात नाही.


ह्या ओटी भरण्याच्या विधी मध्ये हळदी-कुंकवा सोबत तांदूळ, नारळ, सुपारी आणि तांबुल पत्र (विड्याची पाने) आणि गजरा/फुलं हे मुख्य साहित्य होय. त्या मध्ये काही वेळेस फळे आणि नाणी किंवा पाकिटात पैसे घालून पण देतात.


ओटी भरताना आधी करंगळी शेजारील बोट व अंगठ्याच्या साहायाने हळदी-कुंकू सुवासिनीच्या कपाळावर लावले जाते. हळदी-कुंकू हे त्या स्त्रीचे विवाहिततेचे प्रतीक असून तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना स्वरूप मानून लावले जाते. ओटी मध्ये वापरले जाणारे धान्या – तांदूळ हे पावित्र्य, सुपीकता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.


ओटीतील सुपारी हि तितकीच महत्वाची. सुपारीला ‘वर्षायु फळ’असेही म्हंटले जाते, कारण याला तयार होण्यासाठी पूर्ण एक वर्ष लागतो, ह्याचमुळे तीनही ऋतु आपले संस्कार या फळाला देतात. असे म्हंटले जाते की ह्या फळाच्या बळामुळे हे तीनही ऋतुत टिकून राहते, जे निष्ठा, प्रतिबद्धता, दृढ संबंध आणि उपयोगिता दर्शवते. ओटीमध्ये सुपारी अखंडतेचे प्रतीक दर्शवते.


सुपारी सोबत ओटीत न सोललेला नारळ (असोल्या) हि घातला जातो. नारळाला श्रीफळ हि म्हणतात. नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’असे म्हणतात, म्हणजेच असे झाड ज्याच्या सगळ्या अंगांचा उपयोग केला जातो आणि काहीही वाया जात नाही. वरून टणक आणि आतून एकदम मऊ ओलसर खोबरं आणि पाणी हा चमत्कार निसर्गाचं दाखवू शकतो. हा पाण्याने भरलेला नारळ सशक्त गर्भाचे प्रतीक म्हणून ओटीत घातला जातो.


सुपारी आणि नारळ हे दोन्ही दोन तांबूल पत्रांवरती ठेऊन ओटीत घातले जाते. तांबूल पत्र म्हणजेच विड्याची पाने. विड्याची पाने वापरण्या मागे त्याची त्रिदोषांवर मात करायची रासायनिक शक्ती आहे. वात-पित्त-कफ ह्यांवर गुणकारी ठरणारे हे विड्याची पान त्या स्त्रीच्या उत्तम आरोग्याच्या उद्देशाने ओटीत घातले जाते.


ह्याशिवाय काही जण केळी किंवा सफरचंद, पेरू सारखी इतर फळे हि ओटीत घालतात. कुठलही फळ हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे. झाडाला फळ येणे ह्याचा संबंध स्त्रीच्या पोटी मूल होण्याशी सुद्धा जोडला जातो, म्हणून ओटीत फळ घालून तिला हि तिच्या वात्सल्याचे फळ मिळूदेत अशी कामना केली जाते. त्याबरोबर गजरा किंवा फुलं हे सुगंधाने त्या सुवासिनीचे मन प्रसन्न करण्यासाठी दिले जाते.


ओटी भरताना नाणे किंवा पैसे घालण्याची प्रथा अलीकडे सुरु झाली आहे. पूर्वी ओटी मध्ये वस्त्र स्वरूप म्हणून खण (ब्लाउज पीस) दिला जायचा, त्यामुळे “खणा-नारळाने ओटी भर” असे म्हणले जायचे. पण आजच्या मॅचिंगच्या काळात त्याचा विशेष वापर होत नाही, म्हणून त्याची जागा पाकिटातील पैशांनी घेतली आहे एवढेच.


ह्या विधीला जास्त महत्व स्त्रीच्या आयुष्यात ऋतू मास चालू असे पर्यंत (मासिक पाळी) आहे, त्यानंतरही तिची ओटी भरली जाते, परंतु ओटी भरण्याचा मुख्य उद्देश हा नवं सुवासिनीस संतती सुखाचा आशीर्वाद असा आहे. ओटी देणारी आणि घेणाऱ्या दोन्ही स्त्रिया ह्या विवाहित असाव्या लागतात.


शास्त्रात असा उल्लेख आहे कि, एक स्त्री आपल्या आईची ओटी फक्त अधिक महिन्यातच भरू शकते. एरवी सासरी निघालेल्या मुलीची ओटी आई भरते पण अधिकमासात आईची ओटी भरून पुन्हा तुझ्याच पोटी जन्म मिळूदे म्हणून आशीर्वाद मागते अशी प्रथा आहे. पण सासूची ओटी तिने कधीच भरायची नसते. कारण लग्न झाल्यावर त्या माउलीने सुनेची ओटी भरून आपल्या कुशीतील फळ तिच्या स्वाधीन केलेले असते, त्यामुळे सून पुन्हा सासूला ते फळ परत नाही देऊ शकत.

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn