शिव शंकर शंभो
“शिव शंकर शंभो”
हे वाक्य आपण देवाचे नामस्मरण करताना अनेकवेळा ऐकले असेल पण या शब्दांचा नक्की अर्थ काय आहे आणि हे तयार कसे झाले ह्याचा आपण फारसा विचार करत नाही. ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेणार आहोत, शिव आणि शंकर ह्या दोन्हीतील फरक काय आहे आणि शिवाचे वेगवेगळे रूपं कोणती.
शिव, शंकर, शंभो हि एकाच देवाची वेगवेगळी नावं आहेत. शिव म्हणजे साक्षात आदि-देव. आपण असं म्हणू शकतो कि ‘शंकर’ हा शिवातूनच प्रकट झाला आहे. हे कसे तर, आपण जेव्हा त्रिमूर्तींचे नाव घेतो – ब्रम्हा, विष्णू आणि महेश, तेंव्हा ‘महेश’ हा ‘माहा’ आणि ‘ईश’ या शब्दांपासून तयार झालेली एक संधी आहे. ईश हा ‘ईश्वर” चा मूळ शब्द आहे.
शिवाला रचयिता आणि विनाशक असे म्हंटले जाते, तो सृष्टीच्या आणि जीवनाच्या चक्राचे प्रतीक आहे. शिवाचे ‘वीरभद्र’ रूप त्याचे विनाशकारक प्रकृती किंवा संहार दर्शवते. असे म्हणतात कि शून्यातून जी परम चेतना किंवा परम बोध प्रकट झाला तो म्हणजे शिव. शिवाला कोणी बनविले नाही, तो स्वतः निर्माता आहे त्यामुळे त्याला ‘स्वयंभू’ असेही म्हंटले जाते. ‘शिव’ हे रूप शंकराच्या संकल्पनेच्या आधीपासून आहे. शिव वेदांच्याही आधीपासून आहे आणि शिवलिंगा द्वारे त्याची पूजा केली जाते. हे रूप सरळता, आध्यात्मिकता दर्शवते. ‘सदाशिव’ हे नाव याच रूपावर आधारित आहे, ज्याचा अर्थ सर्वव्यापी किंवा अतिशय शांत असणारी व्यक्ती असा आहे. ह्या रूपाचे चित्र बघायला गेले तर व्याघ्र चर्म धारण केलेला, वैराग्य रूपात असलेला शिव आपल्याला दिसतो आणि जो नेहमी एकटाच असतो. शिव हा अतिशय सरळ, भोळा असा देव आहे ज्याला भव्य पद्धितीची पूजा, त्याग, होम हवन अशा गोष्टींची गरज नसते, त्याला फक्त निष्ठा, भक्ती आणि श्रद्धेची गरज असते. जर एका भक्ताने मनापासून तपस्चर्या केली तर तो लगेच खुश होऊन त्या भक्ताला वरदान देतो. ह्या भोळ्या स्वभावामुळे ‘भोलेनाथ’ हे नाव शिवाला पडले.
‘शंकर’ हे नाव पार्वती सोबत जोडले जाते. आपण मुख्यतः ‘गौरी शंकर’ किंवा ‘शंकर आणि पार्वती’ असे म्हणतो, ‘शिव पार्वती’ हे क्वचितच म्हंटले जाते. आता शंकराची उत्पत्ती कधी झाली तर, पार्वती (स्री) शिवा सोबत लग्न करण्यासाठी तपश्चर्या करीत राहिली आणि मग संसार रूपात येताना शिव ‘शंकर’ ह्या रूपात आला. मोहमाये पासून वंचित, तपश्चर्येतून सिद्धी प्राप्त झालेले असे जे शिवाचे अस्तित्व होते त्याचा पुरुष झाला ज्याला सांसारिक गोष्टींची ओढ आहे.
सती ने होमाच्या अग्नीत स्वतःला अर्पण करून मरण पावले आणि शिवाचं तिच्याशी लग्न होऊ शकलं नाही तेव्हा त्याला कोप चढला आणि त्याचा रौद्र अवतार दिसला. या रौद्र अवतारावरून ‘रुद्र’ हे नाव शिवाला पडले. जेव्हा शिष्टाचार सोडून शिवाची प्राणी प्रवृत्ती, उग्रता, त्याचे अग्नी तत्व दिसून येते तेव्हा त्यास रुद्र म्हंटले जाते. रुद्राला तर्क, युक्ती, संतुलन ह्या कशाचीही परवा नसते, त्याला फक्त त्याचा राग शांत करून शिवाला परत आणायचे असते. हा रुद्र अवतार शंकराच्या आधी आला.
जेंव्हा पार्वतीशी लग्न झाले तेंव्हा शिवाने त्याचे वैरागी, संन्यासी जीवन सोडून शंकराच्या रूपात लौकिक, सांसारिक जीवनात पदार्पण केले. जरीही शंकर गृहस्थ झाला असला तरीही तो भौतिक गोष्टी दर्शवित नाही. शिव त्याचे संतुलन कधीही सोडत नाही. रुद्र सुद्धा कोप शांत झाल्यानंतर परत शिव रूपात येतो. त्यामुळे शंकर हे भौतिक वस्तूंचे प्रतीक नव्हे.
संसारामुळे शंकराची आपुलकी, ओढ वाढायला लागली. इथे या शंकराची प्रतिमा तयार झाली जी आपल्याला तसवीरी मध्ये किंवा मंदिरात मूर्तीं मध्ये दिसते.
शिव आणि शंकर हे दोन वेगळे नसून एकच आहे; शिव जो जीवनचक्र दर्शवतो त्याच चक्रामधील एक संक्रमण शंकर दर्शवतो. लोकांना ह्या दोन्हीतील फरक समजायला सोप्पा जावा म्हणून शिवाचे वैराग्य रूपातील चित्रे प्रचलित केली गेली. त्यामुळे शंकर हा एक देव आहे ज्याची आपण मूर्ती बनवतो आणि शिव एक आध्यात्मिक अस्तित्व आहे जो सर्वव्यापी आहे.
शंभो (शम्भू) हा एक बोली भाषेतून तयार झालेला शब्द आहे. वरती आपण पहिले कि शिवाला स्वयंभू म्हंटले जाते. याच शब्दाचा जर सतत वेगाने उच्चार केला तर ‘शंभो शंभो’ असे ऐकू येते. अशाने शिवाला शंभो हे नाव पडले.
चला तर करूया स्मरण ह्या शिवाचे
जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शम्भू ।
जय गिरजा पति भवानी शंकर शिव शंकर शम्भू ॥
Contact
Phone No. : 91+ 749 9846 591
Email: mrunal@vedikastrologer.comOffice Address
Address: Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.
Home Address
Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044
Blogs
Copyright © 2026 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions






