योनी कूट (गुण मिलन)
योनी कूट हे वर्ण, वश्य आणि तारा चक्र नंतर येणारे अष्टकूटातील चौथे कूट आहे. योनी शब्दा वरूनच आपल्याला लक्षात येते कि हा विषय मानवी गुप्तांग बद्दल म्हणजेच प्रजननासाठी मुख्य स्रोत असलेल्या मानवी अंगासंबंधी काहीतरी सांगणार आहे. प्रजनन हा विषय शारीरिक सुखाशी निगडित आहे आणि इतर प्राणिमात्रांच्या तुलनेत मानवाने आपल्या जीवनात ह्याला जास्त प्राधान्य दिलय. मुळात लग्न संस्था ह्याच कारणाने प्राचारणात आणली गेली असावी. शारीरिक सुखाला एक-निष्ठाता आणि वचनबद्धतेत बांधले गेले तेंव्हा त्या सुखाच्या कल्पनेचा खोलवर विचारही केलेला दिसून येतो.
विवाह बंधनात अडकणाऱ्या दोन व्यक्ती ह्या नुसत्याच मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक दृष्टीने अनुरूप असून चालत नाही तर ज्या सुखासाठी लग्न व्यवस्था मान्य करून ते एकरूप होण्याचा विचार करतात त्या शरीर सुखाच्या माध्यमातूनही एकमेकांसाठी अनुरूप असणे गरजेचे असते. आणि ती अनुरूपता पडताळण्यासाठीच योनी कूटाचा वापर केला जातो.
अगदी सामान्य माणसाला समजावे ह्यासाठी योनी कूटामधे प्राण्यांचा संकेतात्मक दृष्टीने वापर केला गेला आहे. येथे प्रत्येक नक्षत्राचे प्रतिनिधित्व एक प्राणी करतो. नक्षत्रे २७ असली तरी प्रतिनिधित्व करणारे प्राणी मात्र १४ आहेत. एखाद्या प्राण्याचे शत्रू कोण हे आपण सहज सांगू शकतो तसेच त्याच प्राण्याला इतर कुठल्या प्राण्यापासून कमी धोका असेल, कोण कुणाचे अधिपत्य मान्य करेल हेही आपण ओळखू शकतो. ह्या वरून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कसे वर्तन करेल हे कळू शकते व ह्याच गोष्टीचा वापर करून आपण ते जोडपे एकमेकांसाठी शारीरिक दृष्ट्या अनुरुप आहे कि नाही, एकमेकांना सुख देण्यास पात्र आहेत कि नाहीत हे पडताळू शकतो.
अष्टकुटातील ३६ पैकी, योनी कूट जास्तीत जास्त ४ गुणांचे योगदान देते. योनी कूट जुळवताना जर वधू आणि वर ह्यांचे योनी कूट प्रकार म्हणजे प्राणी सूचक जर समान किंवा एकच आले तर योनी कूटामधे पूर्ण ४ गुण मिळतात. जर दोघांचे सूचक प्राणी जर मित्र असतील तर ३ गुण मिळतात. जर दोघांचे सूचक प्राणी जर सम असतील म्हणजे ना शत्रू ना मित्र तर २ गुण मिळतात. जर ते एकमेकांचे शत्रू असतील तर १ गुण आणि जर ते एकमेकांचे कट्टर शत्रू असतील तर ० गुण मिळतात.
उदाहरणार्थ: जन्म नक्षत्र नुसार वराचा सूचक प्राणी जर मुंगूस असे धरले, आणि वधूचा पण सूचक प्राणी मुंगूस असेल तर पूर्ण ४ गुण मिळतील. किंवा जर वधूची शेळी वा माकड असेल तर ३ गुण मिळतील. जर वधूचा सूचक प्राणी हत्ती किंवा घोडा असेल तर फक्त २ गुण मिळतील. ह्या उलट जर वधूचा श्वान (कुत्रा) असेल तर १ गुण किंवा जर वधूचा सूचक प्राणी सर्प असेल तर ० गुण मिळतील.
जर ह्या कूटा मधे गुण जमले नाहीत तर? हा प्रश्न खूप जणांना पडतो. उत्तर सरळ आहे, ज्या सुखासाठी लग्न होत आहे ते सुख जर तुम्हाला मिळणार नसेल तर ते लग्न कितपत यशस्वी राहील? सध्याच्या काळात तर अश्या बाबतीत अजिबात तडजोड केली जात
नाही, मग लग्न टिकण्या वर प्रश्न चिन्ह उद्भवतोच. योनी दोष आढळल्यास त्याचा संबंध दाम्पत्याच्या शारीरिक सुखाशी येतो. त्यामुळे जेंव्हा हा दोष उद्भवतो तेंव्हा दाम्पत्याच्या जीवनात भांडण तंटा, विभक्त होणे किंवा घटस्फोट हि होऊ शकतो.
खालील कोष्टक तुम्हाला योनी कुटा मधे तुमचे गुण किती जमतात ते सांगेल

Copyright © 2025 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions